अनाम वीरा
हे देशासाठी प्राण देणार्या अनामिक सैनिका जिथे तु प्राण सोडलास. तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही कोणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही.
या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा लढाईच्या घडणाऱ्या ज्वाला भडकल्या तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास.
सूर्यास्त होताना सायंकाळी जशी क्षितिजाची रेघ मुकेपणाने अंधारात विरून जाते तसा तू भीती न बाळगता कुठलीही आशा-आकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास.
ज्या लोक सेवेसाठी प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उंचबळल्या नाहीत इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोरले गेले नाही.
तुझी यशोगाथा डफड्याच्या तालावर जरी कुणी गायकाने गायलेली नाही तरी देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वी ठरणार आहे.
या घनघोर लढाईत तुझ्या सारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल आपला विजय होईल परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे मृत्यूवर मात करणारे आहे वीरा माझे पहिले वंदन तुलाच आहे.
0 टिप्पण्या